Telangana Asifabad Kolam Guda Pregnant Woman Flood Stretcher Rescue: जोरदार पावसामुळे गावाजवळील ओढ्याला अचानक पूर आल्याने गावाचा बाहेरील जगाशी असणारा रस्ते संपर्क पूर्णपणे तुटला. याच बिकट प्रसंगी कोडापा रामेश्वरी या 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला अचानक तीव्र वैद्यकीय उपचारांची गरज भासली. मात्र, रस्ता पाण्याखाली गेल्याने कोणतीही रुग्णवाहिका किंवा वाहन गावापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील केरामेरी मंडलातील कोलम गुडा या दुर्गम आदिवासी वस्तीत मुसळधार पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली. अखेर गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला. पुराच्या पाण्यातूनच जाण्याचा..
‘डोली’च्या सहाय्याने वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून केला धोकादायक प्रवास
रुग्णवाहिका येणे अशक्य असल्याचे समजताच गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता बांबू अन् कपड्यांच्या मदतीने पारंपरिक ‘डोली’ (तात्पुरते स्ट्रेचर) तयार केली. गर्भवती महिलेला त्यावर झोपवून अनेक तरुण गावकऱ्यांनी खांद्यावर घेत पुराच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून चालण्यास सुरुवात केली. पाण्याचा अंदाज घेत आणि एकमेकांना सावरत गावकऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकत हा जीवघेणा प्रवास यशस्वीरीत्या पार पाडला.
Telangana: Pregnant Woman Carried Across Raging Stream In Komuram Bheem Asifabad district seven-month pregnant woman with severe stomach pain was carried on a stretcher across the flooded Peddavagu 2 men to reach a hospital. Villagers urge the government build bridges urgently pic.twitter.com/BHJdn3BxND — Gummalla Lakshmana (@GUMMALLALAKSHM3) August 13, 2026
केरामेरी प्राथमिक उपचारानंतर आसिफाबाद शासकीय रुग्णालयात रेफर
पुराचे पाणी पार केल्यानंतर रामेश्वरी यांना तातडीने केरामेरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता पोटातील गर्भाची हालचाल जाणवत नसल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील आपत्कालीन उपचारांसाठी तातडीने आसिफाबाद शासकीय रुग्णालयात पाठवले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दुर्गम भागातील आरोग्य अन् पक्क्या रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या थरारक घटनेमुळे आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि रस्ते जोडणीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात ओढे-नाले भरून वाहिल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो आणि पक्क्या रस्त्यांसह पुलांच्या अभावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो. आपत्कालीन परिस्थितीत अशा प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागू नये म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर पक्के रस्ते आणि पूल उभारावेत, अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली आहे.